Classified

★सोबत★ (५) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

प्रथितयश लेखिका सौ मधुर कुलकर्णी यांची नवीन कथा ….. सोबत

★सोबत★ (५) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

 

कितीतरी दिवसांनी रमणीला शांत झोप लागली. तिने मोबाईल बघितला. सहा वाजले होते. उठून फ्रेश होऊन तिने आर्याला फोन लावला.
“हाय ममा! जस्ट रूमवर आलेय. तू कशी आहेस? काल झोप लागली का?”

“हो ग,काल खूप दिवसांनी सलग सात तास शांत झोप लागली. आता थोडा चहा घेऊन वॉकला जाते. जरा उशीरच झालाय. पण आता टाइम टेबल प्रमाणे आयुष्य जगायचं नाही. जेव्हा जे वाटेल ते करायचं.”

“ममा,एक विचारू?”

“विचार की!”

“तू बिल्डिंगमधल्या बायकांशी मिक्स अप हो! पहिलेसारखी! तुझी भिशी सुरू कर. त्या निमित्ताने तू बाहेर पडशील. बोलणं होईल,थोडा विसर पडेल.”

“करेन ग सगळं हळूहळू! तुला सांगू का,दुःख ताजं असलं की त्याच विषयावर सतत बोललं जातं. सगळ्यांना काळजी वाटतेच ग पण त्यांच्या नजरा बघितल्या की मला स्वतःला मी केविलवाणी वाटायला लागते. ते नकोय मला! तुला माहितीय ना पपाला कीव करणं हा प्रकार अजिबात आवडत नव्हता. आणि माझी कोणी केलेली त्याला आवडणार नाही. जरा वेळ जाऊ दे!”

“ओके! ते शेजारचे काका कसे आहेत ग?”

“छान,खूप बोलायला हवं असतं. काल त्यांच्या मुलाशी आणि सुनेशी व्हीडिओ कॉलवर बोलले. छान आहेत दोघेही! ऑस्ट्रेलियाला असतात. आता कधीतरी तुझी व्हीडिओ कॉलवर ओळख करून देईन.”

“ममा,तुला राग येणार नसेल तर एक सांगू! त्या काकांशी ओळख वाढव! तुला तर माहितीय,मी खूप गोष्टी साहिलजवळ शेअर करायचे कारण तो माझा खूप जवळचा मित्र आहे. एखादं सिक्रेट त्याला सांगितलं तर तो कुणालाही कळू देणार नाही ह्याची मला खात्री असते. मी स्वतः मुलगी असून हे कबूल करते की मुली किंवा बायका फार काळ सिक्रेट ठेवू शकत नाहीत. त्यात वाईट हेतू असतो असं नाही,पण मुलींना शेअर करावंसं वाटतं. मुलं किंवा पुरुष कूल असतात.तू जाऊन ये वॉकला,नंतर बोलू,बाय!”

आर्याचं बोलणं अगदीच चूक होतं असं नाही. ह्या नव्या पिढीचे विचार फार क्लिअर असतात. फार खोलात जात नाहीत आणि जे त्यांना योग्य वाटतं ते करतातच.

रमणी वॉकला निघाली. आज दोन राउंड तरी मारायचेच असं ठरवून ती निघाली. स्टॅमिना परत यायला हवा होता. निघतानाच लता वाहिनीचा फोन आला. “रमणी,ठीक आहेस ना? दादा येतोय तुझा दोन दिवस पुण्यात! त्याला आता तुझी सतत काळजी वाटते. तुला बघितलं की तो जरा शांत होईल!”

“आठ वर्षांचं अंतर आहे ग आमच्यात! फार जपलंय त्याने मला! आईबाबा गेल्यावर जास्तच! पण वहिनी,तू त्याच्यापेक्षा जास्त माया करतेस.”

“आता आपणच ग एकमेकांना! राग,लोभ, अहंकार प्रत्येक नात्यात येतोच पण तो धरून नाही ठेवायचा. नाहीतर मग नात्यांना काही अर्थच उरणार नाही. काळजी घे. शेजारी आलं का कोणी राहायला?”

“हो आले! एक मध्यमवयीन गृहस्थ आहेत. चांगले आहेत स्वभावाने! बऱ्याच वेळा बोलणं झालं आमचं! मदतीला धावून येतील असेच आहेत. ”

“चला बरं झालं! आणि तू पण ये सांगलीला! जरा बदल झाला की दुःख विसरायला मदत होते. सांगली..राहायला चांगली..असं म्हणतात,माहिती आहे ना?” लता हसत म्हणाली.

“हो येते वहिनी! आता दादा आला की जरा बरं वाटेल. तू पण काळजी घे. बोलू नंतर!” रमणीने मोबाईल ऑफ केला.

ऊन चांगलंच वाढलं होतं, आता वॉकला जावं का नको तिने विचार केला. सुधाताई यायची वेळ झालीय. तिने जाणं रहित केलं.

***

प्रद्युम्नला जाऊन सहा महिने होऊन गेले. विलास आणि रमणीची मैत्री फुलत होती. रोज वॉकला पार्कमध्ये भेटणं, पदार्थांची देवाण घेवाण,गाणी ऐकणे,कधीतरी नाटक किंवा एखादा चांगला शो बघणे! रमणीला दुःखातून हळूहळू का होईना विलास बाहेर काढत होता. पण समाज…? स्त्री आणि पुरुष एकत्र आले तर ते साधं मैत्रीचं नातं पण असू शकतं हे मान्य करू शकत नाही. आणि विलास आणि रमणी दोघांचेही साथीदार कायमचे सोडून गेलेले! एकाच मजल्यावर दोघे राहत होते. नको त्या चर्चेला उधाण आलं आणि रमणी परत विस्कटून गेली.
अबोल,अलिप्त व्हायला लागली….!

**

रमणी वॉक घेऊन आली. हल्ली रमणी विलासची वेळ टाळत होती. सकाळचा वॉक तिने बंदच करून टाकला. संध्याकाळी घराजवळच थोडं चालून यायची. विलास भेटलाच तर जुजबी बोलायची. त्याच्या घरी जाणं तिने बंद करून टाकलं होतं. ती लिफ्टपाशी यायला आणि बिल्डिंगमधल्या घारपुरे आजी दिसायला एकच गाठ पडली.
“रमणी, तुझ्या शेजारी ते कोण फडके आलेत राहायला ते वागायला बरे आहेत ना? हल्ली काय काय ऐकतो ग आपण! ही साळसूद दिसणारी माणसंच लबाड असतात. बघ बाई,तुझा गैरफायदा घ्यायला नको. नाहीतर लग्नच का करत नाही त्याच्याशी? ते लिव्ह इन का काय,तसलं काही करू नकोस बाई! तुझ्या वयाला शोभणार नाही ते! प्रद्युम्नला जाऊन वर्ष व्हायचंच आहे. वर्षाच्या आत केलं तर चालतं.”

रमणीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ऐंशी वर्षांची बाई ही! काही समज आहे का नाही हिला! आणि लिव्ह इन वगैरे सगळं माहिती आहे. मोठ्यांना उलट उत्तर न देणारी रमणी आजींना मात्र बोलली.
“आजी,टीव्ही सीरिअल बघणं कमी करा. तुमच्या डोक्यात नको ते विचार येतात ना ते कमी होतील. मोठ्या आहात, वयाचं भान ठेवा. मी कुठल्या परिस्थितीतून जातेय ह्याचं गांभीर्य आहे का तुम्हाला? आणि मला तुमचे फुकटचे सल्ले नकोत. माझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायला मी समर्थ आहे.”

रमणी लिफ्टमध्ये शिरलीच नाही. सरळ जिने चढून वर जायला लागली. घरात आल्यावर ती खुर्चीवर बसली. पाच मजले चढून धाप लागली होती. तिने खुर्चीवर मान टेकवली. डोळ्यात पाणी जमायला लागलं. कधी बदलणार आपला समाज? ही आत्तापर्यंत शेजारी,आपली वाटणारी माणसं असं बोलू शकतात? विलासच्या मैत्रीत आत्ता कुठे थोडा आनंद मिळत होता. त्याचं मर्यादशील वागणं,बोलणं आवडायला लागलं होतं. त्याच्या सहवासात निर्धास्त वाटत होतं. एक मित्र म्हणून त्याच्यावर सगळा भार सोपवावा इतका तो जवळचा वाटायला लागला होता. पण ही आजूबाजूची माणसं मला सुखाने जगू देणार नाहीत. तिने रागारागात मुग्धाला फोन लावला.
“मुग्धा,तुझ्या घराजवळ माझ्यासाठी भाड्याने एखादा फ्लॅट बघ! मला आता इथे राहायचं नाही.” रमणीच्या घशात आवंढा आला.

“रमणी, काय झालं अचानक? कोणी काही बोललं का? विलासचा आणि तुझा वाद झाला का?” मुग्धाने काळजीने विचारलं.

“विलासचा काय संबंध ह्यात? तो कोण लागतो माझा? तुम्ही सगळे मला त्याच्याशी का जोडताय? का?
मला स्वतःला वाटू शकत नाही का दुसरीकडे जावं? ह्यात विलास कुठे येतो?”

“तुम्ही सगळे? काय झालं रमणी? तुला नक्कीच विलासवरून कोणीतरी बोललंय. नीट सांग मला सगळं!”

“मुग्धा,थकले ग मी! एकटी लढून थकले. विलासचा मैत्रीचा आधार मिळाला पण तो देखील लोकांना बघवत नाहीय. नकोच हे बाईचं जीणं! प्रद्युम्न गेला मला एकटीला टाकून! मी लढतेय, माझ्या शरीराशी,मनाशी, समाजाशी! मुग्धा,आता नाही सहन होत ग! हा एकटेपणा खायला उठतो.”रमणी हुंदके द्यायला लागली.

“रमणी शांत हो ग! मी येऊ का आत्ता तुझ्या घरी? शांत हो बरं! मला चैन पडत नाहीय.”

रमणी रडत रडतच म्हणाली,
“नको ग! इतक्या लांब कुठे येतेस? सॉरी, माझा तोल गेला. समजून घे मला!”

“मी उद्या सकाळीच तुझ्याकडे येते. दिवसभर थांबते. पण मला तू आधी प्रॉमिस कर की आता रडणार नाहीस. हवं तर रात्री रेस्टीलची गोळी घेऊन झोप.”

“काळजी करू नकोस मुग्धा! उद्या सकाळी ये तू!” रमणीने मोबाईल बंद केला.

जेवायची पण इच्छा होत नव्हती. तिने दुधाबरोबर रेस्टीलची गोळी घेतली. खरं तर आठच वाजले होते पण ती कॉटवर आडवी झाली गोळीचा असर सुरू व्हायला लागला. डोळे पेंगुळले होते. बेल वाजली म्हणून रमणी दाराशी आली.

दारात विलास होता.
“आज मुगाची खिचडी केली आहे. तुला आवडते ना? थोडी आणून देतो.”

“का लागला आहेस तू माझ्या मागे? तुझ्या घरी मी येणं बंद केलं,तुझ्याबरोबर वॉक घेणं बंद केलं,तुझ्याशी बोलणं कमी केलं. ह्याचा अर्थ कळत नाही का तुला?”रमणी संतापली होती.

“रमणी,आर यू ओके? काय झालं? इतकी का चिडली आहेस?”

“सगळेच बोलताहेत तुझ्या माझ्याबद्दल! आपलं लफडं आहे असं वाटतंय सगळ्यांना! लिव्ह इन मध्ये रहा,लग्न करा असे सल्ले देताहेत मला सगळे!” रमणी त्वेषाने बोलली.

“शट अप रमणी! माईंड युअर लँग्वेज! लफडं? इतका घाणेरडा शब्द तू उच्चारलास तरी कसा? मैत्रीचा अपमान केला आहेस तू आपल्या!”

“हो केलाय! कारण एक विधवा आणि एक विधुर ह्यांची मैत्री होऊ शकत नाही. समाजाला ते मान्य नाही.” रमणी रडायला लागली.

“ठीक आहे! आज आत्ता ह्या क्षणी मी तुला पत्नी म्हणून स्वीकारायला तयार आहे. आण घरातलं कुंकू! लावतो तुझ्या कपाळावर! ऑफिशियल झाल्यावर सांग समाजाला,हा माझा नवरा आहे. आहे तयारी तुझी? काहीही झालं तरी मी तुला एकटं सोडणार नाही.”

“विलास,दूर हो माझ्या नजरेसमोरून प्लिज! मी हात जोडते.” रमणी खुर्चीत बसून रडायला लागली.

विलासने प्लेटमध्ये गरम खिचडी आणली. टेबलवर ठेवत म्हणाला,
“खाऊन घे गरम गरम! आणि दार नीट लावून झोप. उद्या बोलू.”
विलास गेला आणि रमणी भरल्या डोळ्यांनी त्या खिचडीकडे बघत जोरात ओरडली,
“विलास,मला माफ कर!”….!

क्रमशः!

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}