Classified

★सोबत★ (६) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

प्रथितयश लेखिका सौ मधुर कुलकर्णी यांची नवीन कथा ….. सोबत

★सोबत★ (६)  ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

 

रमणी आज मंडईत गेली आणि परत प्रद्युम्नच्या आठ्वणींनी तिच्याभोवती फेर धरला. दर रविवारी दोघेही मंडईत जायचे. प्रद्युम्नला पालेभाज्यांचे फार वेड! पालक,मेथी,राजगिरा, ज्या दिसतील त्या भाज्या आणायच्या. मग भाकरी,लोणी आणि नुसती कांदा घालून परतलेली पालेभाजी! स्वारी खुश!
“मी धरू का बॅग? किती भाज्या घेतल्या आहेस! एकटी इतक्या खाणार आहेस का?”

रमणीने वळून बघितलं. बाजूला विलास हसत उभा होता.
“सांगितलं नाहीस ते,मंडईत जातेय. तुझ्याबरोबरच आलो असतो ना!”

रमणी काही न बोलता भाजीवाल्याला पैसे देऊ लागली.
“निघते!” विलासकडे न बघता चालायला लागली.

विलास रमणीकडे बघत राहिला. काय झालंय हिला? कोणी आमच्या भेटण्या,बोलण्यावरून हिला बोललं तरी इतकं का हिने मनावर घ्यावं? चांगल्या मैत्रीचा अंत करू बघतेय. हिला मी दुःखातून बाहेर काढायचा प्रयत्न केला. रमणी थोडी स्थिरावली पण होती पण हे काय मधेच! काही काळ हिच्यापासून लांब राहायला हवं! ती नॉर्मल होइपर्यंत!

**

रमणीने भाजीच्या बॅगमधून ताज्या पालेभाज्या,बीट, कांद्याची पात सगळं दुसऱ्या बॅगमध्ये ठेवलं. कांदे-बटाटे काढून ठेवले. मुग्धाकडे दोन दिवस राहायला जायचं तिने ठरवलं होतं. ताज्या भाज्या मुग्धाकडे न्यायच्या म्हणूनच तिने भरपूर घेतल्या होत्या. मुग्धाचा नवरा दोन दिवस दौऱ्यावर गेला होता. तिने एका छोट्या बॅगमध्ये दोन दिवसांचे ड्रेस घेतले,भाजीची बॅग घेतली. दाराला कुलूप लावलं आणि सवयीप्रमाणे तिची नजर विलासच्या दरवाजाकडे गेली. सांगू का विलासला,मी दोन दिवस मुग्धाकडे
जातेय. पण कशाला? नकोच! आता जे ठरवलं तेच करायचं. कामापुरतं शेजारी म्हणून बोलायचं!
***

मुग्धाने कॉफी करताना हळूच रमणीकडे बघितलं. काहीतरी चांगलंच बिनसलेलं दिसत होतं. रमणीला इथे येऊन तास झालाय तरी गप्पच आहे. तिने रमणीच्या हातात कॉफीचा मग दिला,
“रमणी,इथे येऊन अशी गप्प गप्प राहणार आहेस का? तू तुझं मन मोकळं करावं म्हणून मी तुला इथे बोलावलं आहे.”

“मुग्धा,नवरा गेल्यावर एकटीने आयुष्य काढणं फार अवघड आहे ग! किती निर्धास्त असतो ग आपण तो असला की! कशाचीही काळजी वाटत नाही.”

“विलासशी तुझा काही वाद वगैरे?….”

“मुग्धा,तो तसा आहे का ग? त्याच्यामुळे मी खूप सावरले खरं तर! सुरवातीला रात्री झोपच यायची नाही. गोळ्या तरी किती घ्यायच्या? पण विलासशी ओळख झाली,मग घट्ट मैत्री झाली. थोडं तरी जगावंस वाटायला लागलं. असं वाटत होतं,आर्या इथे नसली तरी आता विलास आहे. माझी खरंच काळजी करणारा! पण लोकांना बघवत नाही ग निखळ मैत्री!”

“रमणी,हे असंच चाललंय आणि चालत राहणार. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्यांना पण लोकं नाव ठेवतातच ग! आपल्या संस्कृतीत गळ्यात काळे मणी असल्याशिवाय ह्या नात्याला स्वीकारत नाही ग कोणी! एक विचारू तुला?”

रमणीने प्रश्नार्थक नजरेने मुग्धाकडे बघितलं.

“असं किती दिवस फक्त मैत्रीचं नातं जपणार तू? आणि ह्या सगळ्या मनस्तापाचा राग तू विलासवर काढतेय. तुला जर ही मैत्री मान्य नसेल तर सरळ त्याला तोडून टाक. त्याच्या मनाला यातना देऊ नकोस. मी विलासशी तीन चार वेळा बोललेय. तो खरा वाटला मला! त्याच्या वागण्यात कुठेही उथळपणा नाही. आहे ती फक्त तुझ्याबद्दल काळजी!”

“हो कळतंय ग! नकळत एकदा फक्त त्यादिवशी त्याच्यावर ओरडले. भयंकर नैराश्य आलं होतं. पण त्यानंतर मीच त्याला भेटणं,त्याच्याशी बोलणं कमी केलं. ज्या वाटेला जायचंच नाही तिथे पाऊल तरी का टाकायचं?”

मुग्धाने मग विषय वाढवलाच नाही. तिला कळून चुकलं की रमणी संभ्रमात आहे. विलासशी कसं वागायचं हे तिचं तिलाच कळत नाहीय.
***

मुग्धाकडे दोन दिवस खरंच छान गेले होते. दोन दिवस अगदी माहेरवाशीणीसारखे लाड मुग्धाने केले. आर्याला फोन करावा म्हणून रमणीने मोबाईल घेतला.
“झोपलीस का ग आर्या?”

“नाही ग,उद्या प्रेझेंटेशन आहे,त्याची तयारी करतेय. आलीस का तू मुग्धामावशीकडून?”

“ही काय आत्ताच येतेय. ब्रेकफास्ट करूनच निघाले होते. आता भात पिठलं करते.”

“ममा…!”

“काय ग? बोल ना!”

विलासकाकाशी काय झालंय तुझं? काही वाद?”

“छे ग,वाद करायला आम्ही लहान आहोत का?”
विलासशी ओळख वाढल्यावर रमणीने एकदा आर्याला व्हीडिओ कॉल केला. तेव्हापासून आर्याची आणि त्याची चांगलीच गट्टी जमली. दोघांचेही सतत व्हाट्स अप वर बोलणं सुरू असायचं. विलासने तिला वेद आणि रियाचा नंबर पण दिला होता. आर्याची आणि रियाची पण छान मैत्री झाली होती.

“मग तू त्याच्याशी बोलणं कमी केलं असं तो म्हणाला. कोणी काही बोललं का ममा तुला? ममा,आता तुझं आयुष्य तू तुझ्या टर्म्स वर जग! जगाचा विचार करत बसलीस तर शांतपणा कधीच मिळणार नाही. आणि तू काहीतरी सुरू कर. माझी ममा अशी नुसती घरात बसून रडणारी नाहीच. तुझ्यावर आलेला प्रसंग फार हलवून टाकणारा आहे. पण ममा…!”

“हो,मी ट्युशन्स घ्यायचा विचार करतेय. आठवी ते दहावी… सायन्स!”

“गुड! आणि विलासकाकाशी बोल ग! ही इज अ जेम ऑफ अ पर्सन!बाय,टेक केअर!”

रमणीला आतून जाणवलं की तिने विलासशी बोलणं कमी केल्यापासून ती अस्वस्थ आहे. उलट त्याचे विचार डोक्यात जास्त यायला लागले होते. त्याच्याशी बोलत होते तेव्हा ती कधीच विलासचा इतका विचार करत नव्हती. जावं का विलासशी बोलायला? त्याची काय चूक होती? माझंच चुकलं! मी फार पोरकट वागले. उद्या सकाळीच विलासला ब्रेकफास्टला बोलावते.

हा विचार रमणीच्या मनात आला आणि ती एकदम शांत झाली. तिची अस्वस्थता कमी होत गेली….!

***

रमणी मोबाईलची रिंगने डोळे चोळतच उठली. धाकट्या जावेचा,सुरुचीचा फोन होता. इतक्या पहाटे? तिला घाबरायला झालं. तिने फोन घेतला.
“वहिनी,आई रात्री वॉशरूममध्ये पाय घसरून पडल्या. डावा पाय खूप सुजलाय. नऊ वाजता डॉक्टर आले की त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. तुम्ही प्लिज येता का? तुम्ही आलात तर निदान समरला सांभाळू शकाल. मला आणि ह्यांना आईंना घेऊन दवाखान्यात एक्स रे काढायला जावं लागेल. तुम्ही तासाभरात निघाला तर पुण्याहून साताऱ्यात अडीच तासात पोहोचाल. मी वाट बघतेय.”

रमणीला बोलायला सुरुचीने संधीच दिली नाही. वाट बघतेय म्हणल्यावर जायलाच हवं. प्रद्युम्न गेल्यावर चार दिवस फक्त दिर-जाऊ होते. नोकरी असल्यामुळे सुरुची राहू शकत नव्हती. चौदाव्या दिवशी आली आणि लगेच पंधरा दिवस झाले की सासूबाईंना घेऊन दोघे लगेच गेले. पण ही वेळ ते सगळं आठवायची नव्हतीच. नातं जपायलाच हवं होतं.

रमणीने आवश्यक ते सामान बॅगमध्ये भरलं. सुधाताईंना, कामवाल्या बाईंना येऊ नका म्हणून फोन केला. दाराला कुलूप लावून विलासला सांगून जावं म्हणून तिने बघितलं तर विलासच्या दाराला कुलूप होतं. कदाचित वॉकला गेला असावा. बसमध्ये बसल्यावर त्याला मेसेज टाकू म्हणून ती निघाली.

स्वारगेटला बस लगेच मिळाली. खिडकीजवळ जागा मिळाली आणि वाऱ्याच्या झुळुकीने तिला डुलकी लागली. गाडी वळणं घ्यायला लागली तशी रमणीला जाग आली. खंबाटकी घाट सुरू झाला होता. रमणीला आठवलं की विलासला मेसेज करायचा राहिला होता. तिने पर्समधून मोबाईल काढला आणि आर्याला आणि विलासला मेसेज टाकला. विलासशी आता पहिलेसारखं बोलायचं हे ठरवल्यापासून तिचं मन शांत झालं होतं. लोकं बोलणारच,ते साहजिकच होतं पण विलासची मैत्री तोडणं हा समजुतदारपणा नव्हता. दोघांचीही पन्नाशी उलटली होती. विलाससारखा मित्र मिळणं आणि ते देखील तिला गरज असताना,हे तिचं भाग्यच होतं. विलास जसं नेहमी म्हणतो,”उपरवाले का प्लॅन है.” ते आठवून रमणी गालात हसली. मनावरचं मळभ दूर झालं होतं. आता पुण्यात परत आले की विलासची माफी मागायची.

**

रमणीच्या सासूबाईंच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. कण्यात फार मोठी गॅप पडली होती. ऑपरेशन अपरिहार्य होतं. तिला कळून चुकलं, तिचा साताऱ्याचा मुक्काम लांबणार होता.

दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन झालं. दीड महिना सासूबाईंना सक्तीची विश्रांती सांगितली. सुरुची म्हणालीच, “वहिनी,आता तुम्ही काही दिवस इथेच रहा. भाऊजी गेले तेव्हा दहा दिवस मी समरला पाळणा घरात ठेवलं होतं पण त्याला आजीची सवय असल्यामुळे त्याने तिथे फार त्रास दिला. आणि माझ्या आईला पण दम्याचा त्रास आहे,त्यामुळे ती येऊ शकत नाही. तुम्हाला पुण्यात आता काय काम आहे? तिथेही एकट्याच राहता, त्यापेक्षा इथे रहा.”

सुरुचीचं इतकं स्पष्टपणे बोलणं ऐकून रमणी चमकली. प्रद्युम्न गेल्यावर हिने साधा फोन करून सुध्दा म्हटलं नाही की वहिनी काही दिवस आमच्या घरी या. इथे समर आहे,तुमचं मन रमेल. आणि आता अचानक हिला गरज आहे म्हणून मला रहा म्हणतेय. रमणी मोठी असून सुद्धा कधीही सुरुचीला मोठी जाऊ म्हणून वागणूक दिली नाही. आपलीच माणसं इतकी स्वार्थी असू शकतात? प्रद्युम्न नेहमी म्हणायचा.
“सुरुची फार तुटक आणि स्वार्थी आहे. तिच्या फार जवळ जाऊ नकोस.”

“प्रद्युम्न,हे काय बोलतोस तू? अरे,ती आपली रक्ताची माणसं आहेत. त्यांना दूर लोटायचं का? अडचणीत तेच करतात ना आपलं?”

“रमा, खरं सांगू? अडचणीतच कळतं,कोण आपलं आणि कोण परकं!”

किती खरं बोलला होता प्रद्युम्न!
“वहिनी,थांबताय ना तुम्ही?”

“हो,थांबते!” रमणीने कर्तव्याला प्राधान्य दिलं.

आर्याचा फोन येऊन गेला पण विलासने काहीच रिप्लाय दिला नव्हता. त्याने मेसेज वाचला होता. रमणीच्या मनात चलबिचल व्हायला लागली.

**
साताऱ्याला येऊन सव्वा महिना होऊन गेला होता. आठ दिवसांनी सासूबाईंना वॉकरने चालायची परवानगी दिली होती. रमणीला आता घरचे वेध लागले पण ती जास्त अस्वस्थ झाली ते विलासच्या वागण्याने! ती पूर्वीसारखं वागायचा प्रयत्न करत होती पण आता विलास अंतर ठेवून होता. ह्या आठ दिवसात तर तिच्या एकाही मेसेजला त्याने रिप्लाय केला नव्हता. कधी एकदा विलासची बोलते असं तिला झालं.

आठ दिवसानी रमणीने सुरुचीला स्पष्टच सांगितलं,”सुरुची,मी उद्या पुण्याला परत जाते आहे. प्रद्युम्नच्या ऑफिसमध्ये मला पेन्शनची कामं आहेत. आईंना आता समरला सांभाळणं होणार नाही. त्याला पाळणा घरात ठेव आणि आईंसाठी दिवसभराची एक बाई ठेव. हवं तर पैसे मी पाठवत जाईन.”

“पैशाची गरज नाही आम्हाला! आम्ही दोघेही कमावते आहोत. तुमची मर्जी!” सुरुची फटकळपणे बोलली.

दोन दिवसांनी सुरुची पुण्याला निघाली. बसमध्ये बसली आणि तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आपली माणसं दुखावून गेली आणि जो मला पूर्णपणे परका होता त्याने माझी काळजी घेतली. अगदी संयम राखून,संयतपणे,जबाबदारीने..आणि त्यालाच मी दूर लोटलं होतं. तिचे अश्रू थांबतच नव्हते….!

***

घराचं कुलूप उघडताना रमणीने विलासचं दार बघितलं,कुलूप होतं. विलास परत आल्यावर आज त्याच्याकडे अळूची वडी घेऊन जाते. मग त्याबरोबर चहा,गप्पा,गाणी…!
कल्पनेनेच रमणी मनात शांत,खुष झाली.

तासाभराने तिने दार उघडून विलासचा दरवाजा बघितला. कुलूप नव्हतं. तिने बेल वाजवली. एका अनोळखी व्यक्तीने दार उघडलं.
“विलास…? रमणीने विचारलं.

“आपण रमणी का?”

“हो!”

“मी विलासचा मित्र सिद्धेश! विलासकडून ऐकलंय तुमच्याबद्दल!
बसा ना!”

“विलास नसेल तर निघते. येईन परत!”

“विलास ऍडमिट आहे. तुम्हाला माहिती नाही का?”

“नाही,काहीच माहिती नाही. मी साताऱ्याला होते. पण त्याने काही मेसेज पण केला नाही.” रमणी घाबरली.

“आम्ही पाच मित्र ट्रेकिंगला गेलो होतो. तिथे विलास चक्कर येऊन पडला. पायाला बरंच खरचटलं. शुगर खूप वाढली होती. ट्रेकिंग अर्धवट सोडून सगळे परत आलो. त्याला लगेच ऍडमिट केलं. शुगर असल्यामुळे जखमेची काळजी घ्यायला हवी!”

रमणीला ते ऐकून भोवळ आल्यासारखं झालं. प्रद्युम्नचं सगळं डोळ्यासमोर आलं. पाय कापायला लागले. ती खुर्चीवर बसली.”

“आर यू ओके वहिनी?” सिद्धेशने लगेच तिला पाणी दिलं.

“मी ठीक आहे. कुठल्या दवाखान्यात आहे विलास?”

“रिकव्हरी हॉस्पिटलमध्ये! मी त्याचे कपडे आणि काही सामान घ्यायला आलोय घरी!”

“मी निघतेय लगेच हॉस्पिटलमध्ये! मला द्या,मी घेऊन जाते आणि दिवसभर मी थांबेन तिथे! तुम्ही विश्रांती घ्या आज! मी घराला कुलूप लावून येते.”

रमणीने सिद्धेशकडून बॅग घेतली,रिक्षा करून दवाखान्यात आली. रूमच्या दरवाजातून तिने विलासला बघितलं आणि तिला हुंदका आला. विलास आश्चर्याने ओरडला, “रमणी,तू इथे?”

“का वागलास असं? का? इतकं सगळं झालं आणि तुला साधा मेसेज पण नाही टाकता आला मला?” त्याच्याजवळ बसत रमणी रडायला लागली.

“रमणी,काय हे?”

“मला माफ कर विलास! मी चुकले! प्रद्युम्नला ह्याच आजारापायी मी गमावलं, पण आता तुला नाही! तुझी साथ हवीय मला! एकटी आयुष्य काढणं नको वाटतंय रे,तू सवय लावलीस मला तुझी!” रमणी हातात तोंड खुपसून रडायला लागली.

“रमणी, शांत हो! मी कुठेही जात नाहीय आणि जाणार नव्हतोच. तुला स्पेस हवी होती म्हणून थोडा बाजूला झालो. वेडाबाई, मी तर त्या दिवशीच तुझ्या कपाळावर कुंकू लावायला तयार होतो. बरं, मला एक सांग,कार्यालय कुठलं बुक करायचं?” विलास हसत म्हणाला.

“इथेही तुला चेष्टा सुचतेय?”

“रमणी,तुला हसवायला,तुझी काळजी घ्यायलाच देवाने तुझ्या आयुष्यात मला पाठवलं आहे. मी तुला वचन देतो,मी माझं कर्तव्य पूर्ण करेन.”

“लवकर बरा हो आणि घरी ये!”

“पण मॅडम,मी तुमच्या घरी राहायचं का तुम्ही माझ्या घरी राहणार?”

“आलटून पालटून!”
दोघेही खळखळून हसले.

**

रमणीने देवाजवळ दिवा लावला,विलाससाठी डोळे मिटून प्रार्थना केली. डोळे उघडले आणि प्रद्युम्नच्या फोटोकडे बघितलं.
आज तो हसत तर होताच पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान देखील दिसत होतं……!

★समाप्त★

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}